तुळजापूर (प्रतिनिधी)- पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर येथे आयोजित तीन दिवसीय रिजनल ॲथलेटिक्स स्पर्धेला सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन विशाल रोचकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए. एस. कांबळे, उपप्राचार्य एन. एस. सिंग, बीडचे प्राचार्य व्ही. एस. भोस, सोलापूरचे प्राचार्य विशाल कोटेकर, धाराशिवचे उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर, तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले, डॉ. अविनाश ढगे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
या तीन दिवसीय स्पर्धेत 100, 200, 400, 600, 1500, 3000 व 5000 मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, अडथळा शर्यत आणि रिले अशा विविध स्पर्धा 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील विविध नवोदय विद्यालयांमधून 240 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, येत्या काळात गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 40 खेळाडूंची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी जाधव यांनी केले. तर एस. एस. माने यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक आशुतोष माने, अक्षय बागडे, सनी जाधव आणि क्रीडा अध्यापिका योगिनी साळुंखे विशेष परिश्रम घेत आहेत.
