मुरुम (प्रतिनिधी)- काळ पुढे सरकत राहतो, आयुष्याच्या वाटा बदलत जातात; मात्र विद्यार्थी जीवनातील आठवणींची पाऊलखूण कधीही पुसली जात नाही. अशाच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा भावस्पर्शी क्षण भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अनुभवायला मिळाला. महाविद्यालयाच्या 1986 च्या पॉलिटेक्निक बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल चाळीस वर्षांनंतर पुन्हा आपल्या ज्ञानमंदिरात एकत्र आले आणि संपूर्ण परिसर आठवणींच्या सुगंधाने भारावून गेला.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून खास या भेटीसाठी आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वर्गखोल्या, वसतिगृह, खेळाचे मैदान आणि कॅम्पसचा फेरफटका मारत आपल्या तारुण्याच्या दिवसांना पुन्हा एकदा जणू स्पर्श केला. प्रत्येक कोपरा, प्रत्येक पायरी आणि प्रत्येक वर्ग व्हॉलीबॉल ग्राउंड त्यांच्यासाठी आठवणींचा खजिना ठरला. चार दशकांनंतर पुन्हा भेटलेल्या वर्गमित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांतील ओलावा आणि मनातील आपुलकी पाहून वातावरण भावनांनी भारावून गेले.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल शिवाजीराव मोरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. कर्मयोगी श्रीधरराव मोरे (अण्णा) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला आणि संस्थेने दिलेल्या संस्कारमय शिक्षणाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
भावनांना वाट मोकळी करून देताना माजी विद्यार्थ्यांनी सांगितले, “आम्ही आंध्रप्रदेशमधून उमरग्यात शिक्षणासाठी आलो. तीन वर्षे वसतिगृहात राहिलो. येथील शिस्त, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, संस्थेचे संस्कार आणि मिळालेल्या संधी यामुळेच आज आम्ही जीवनात यशस्वी झालो. आमच्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो आणि नातवंडांसाठीही प्रेरणादायी वारसा निर्माण करू शकलो. या सर्व यशाचे श्रेय या महाविद्यालयालाच जाते.“
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन आणि गुणवत्ताविषयक प्रगतीची माहिती देत माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी कायम ऋणानुबंध जपावेत आणि भावी पिढ्यांच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. या भेटीत उमरग्यातील आर. टी. ओ. जाधव, प्रदीप वाघ, राजेंद्र पतगे, राजू सूर्यवंशी यांच्यासह अनेक जुन्या सहाध्यायांच्या आठवणी जाग्या झाल्या. एम. शिवकुमार, के. रघू रामय्या, बी. वेणुगोपाल, टी. हर्षवर्धन, ए. श्रीधर आणि पी. जितेंद्र रेड्डी यांनी महाविद्यालयीन जीवनातील संस्मरणीय प्रसंग सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थीदशेचे निरागस हास्य खुलले होते.
ही भेट केवळ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नव्हती; ती होती संस्कार, कृतज्ञता आणि ऋणानुबंधांचा उत्सव. शिक्षणसंस्थेने घडविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पुन्हा एकदा आपल्या मातृसंस्थेला अर्पण करत, “विद्यार्थी महाविद्यालय सोडतो; पण महाविद्यालय विद्यार्थ्याला कधीच सोडत नाही,“ या भावनेची जिवंत प्रचिती या अविस्मरणीय भेटीतून सर्वांना अनुभवायला मिळाली.
