भुम (प्रतिनिधी)-  बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदारांची थकीत बिले तातडीने अदा करण्यात यावीत. या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भिमराव अंधारे (महाराज) यांनी 21 जुलैपासून सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतले. कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाकडून 5 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व थकीत ऊसबिले व वाहतूक देयके अदा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

उपोषणादरम्यान शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार आणि विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर अखेर कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी पत्र देत थकीत देयके निश्चित मुदतीत अदा करण्याची ग्वाही दिली. व्यवस्थापनाने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आयान मल्टीट्रेड एलएलपी या कंपनीने बाणगंगा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविला होता. मात्र, 5 जून 2026 रोजी कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदणीकृत तसेच कारखान्याचे सर्व हक्क, अधिकार, मालकी आणि दायित्वे राजगंगा शुगर अँड अलाइड प्रॉडक्ट एलएलपी या नव्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.

त्यामुळे कारखान्याशी संबंधित सर्व देणी व जबाबदाऱ्या नव्या व्यवस्थापनाकडे गेल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार यांची थकीत देयके आर्थिक अडचणीमुळे प्रलंबित राहिल्याचे नमूद करत, ती 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अदा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. हे लेखी आश्वासन स्वीकारत गणेश महाराज अंधारे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून चौथ्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. 


 
Top