तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी बांधवांच्या बायोमेट्रिक नोंदणी व अधिकृत ओळखपत्रासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा लागू करू नये, अशी मागणी तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद  विलासराव गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात हिंदू धर्मातील परंपरा, कुलधर्म आणि कुलाचारानुसार प्रत्येक पात्र पुजारीला पूजा-अर्चा करण्याचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हिंदू धर्मात पुजारीपदासाठी कोणतीही वयोमर्यादा नसल्याने बायोमेट्रिक नोंदणी व ओळखपत्रासाठीही अशी अट घालणे योग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या पुजारी कुटुंबांमध्ये पूजा करण्यासाठी वडीलधारी व्यक्ती उपलब्ध नाही, अशा कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून त्या घरातील प्रत्येक पात्र व्यक्तीची वयाचा विचार न करता बायोमेट्रिक नोंदणी करून अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

.मंदिर संस्थानने पुजारी बांधवांच्या हिताचा विचार करून वयोमर्यादा रद्द करावी आणि सर्व पात्र पुजाऱ्यांना बायोमेट्रिक नोंदणीसह अधिकृत ओळखपत्र देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे यांनी केली आहे.

 
Top