तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवर असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील व लगत च्या संरक्षक भिंतीला म तडे गेल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संरक्षक भिंत धोकादायक बनत असल्याचा आरोप करत, संबंधित बांधकामाची तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक व पालकांकडून होत आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सैनिक विद्यालयाच्या परिसरात भव्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम नुकतेच पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बाहेरून संरक्षक भिंत आकर्षक दिसत असली तरी जवळून पाहिल्यानंतर तिच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
संरक्षक भिंतीच्या मधोमध आडने उभे तडे पडल्याचे दिसून येत असून, प्रवेशद्वाराच्या बाजूलाही अर्धा इंच ते एक इंचापर्यंत तडे गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस या तड्यांचे प्रमाण वाढत असल्याने भिंतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गालगतच्या फ्रंट साईडला असलेल्या भिंतीची ही अवस्था असल्यास, आतील बाजूच्या बांधकामाची परिस्थिती काय असेल, असा सवाल पालक व नागरिक उपस्थित करीत आहेत.
आता संरक्षक भिंतीला तडे गेल्याने बांधकामाच्या गुणवत्तेची पोलखोल झाल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याची शक्यता असताना संबंधित अभियंत्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का, तसेच कामाचे बिल कोणत्या निकषांवर काढण्यात आले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.
