कळंब (प्रतिनिधी)- पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी बाबासाहेब माधवराव माने व  प्रभावती बाबासाहेब माने यांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कळंब आगाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.

कळंब आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांच्या हस्ते माने दांपत्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. आषाढी वारीच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला प्रथमच मिळाल्याने हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सत्कार सोहळ्यावेळी कळंब बसस्थानक परिसरात प्रवासी, वारकरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेना (शिंदे गट)चे अजित पिंगळे, लक्ष्मीकांत हुलजुते, राज्य परिवहन महामंडळाचे प्रभाकर झांबरे, वाहतूक नियंत्रक हनुमंत मुंडे, चालक बालाजी बोराडे, वाहक बळीराम बोबडे, उमाकांत गायकवाड, अशोक पाटील, महेश थोरबोले, ज्ञानोबा कुंभार, महिला वाहक आशा वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी माने दांपत्याचे अभिनंदन करून त्यांच्या वारकरी सेवेला सलाम केला.यावेळी उपस्थितांनी, बाबासाहेब माने दांपत्याला मिळालेला हा सन्मान केवळ गौरगाव किंवा कळंब तालुक्याचाच नसून संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या वारकरी परंपरेचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली.


‌‘वीस वर्षांची अखंड पायी वारी अन्‌‍ विठुरायाची कृपा'

बाबासाहेब माने यांनी गेली तब्बल वीस वर्षे कोणत्याही दिंडीचा किंवा वाहनाचा आधार न घेता पत्नी प्रभावती माने यांच्यासह दरवर्षी पायी पंढरपूरची वारी केली आहे. विठ्ठलावरील अखंड श्रद्धा, निष्ठा आणि सातत्यपूर्ण वारीचेच फळ म्हणून यंदा श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महापूजेचा मान मिळाल्यानंतर कळंबकडे परतताना योगायोगाने त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पंढरपूर-कळंब (एमएच-20 बीएल-1969) ही बस मिळाली. चालक बालाजी बोराडे व वाहक बळीराम बोबडे यांनी त्यांचे मनापासून स्वागत करून प्रवास संस्मरणीय केला. या प्रसंगाने सत्कार सोहळ्याला आणखी भावनिक आणि संस्मरणीय स्वरूप प्राप्त झाले.


 
Top