भूम (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरगाव (पा.), ता. भूम, जि. धाराशिव व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बाल वारकरी, शिक्षण दिंडी मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या दिंडीत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मृदंग, भगवे ध्वज, तुळशी वृंदावन आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा घेऊन गावातून पदयात्रा काढली. “ज्ञानोबा-तुकाराम“, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल“, “जय जय राम कृष्ण हरी“ अशा नामघोषांनी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण आणि सामाजिक ऐक्य यांसारखे जनजागृतीपर संदेश देत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.

या सोहळ्यात गावातील मातापालक, ग्रामस्थ, नवतरुण मंडळी, भजनी मंडळ, आराध्या मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच अनेक विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक दानशूर ग्रामस्थांनी अन्नदान करून वारकरी आणि विद्यार्थ्यांची प्रेमाने सेवा केली. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण दिंडी अधिक आकर्षक, भक्तिमय आणि संस्मरणीय ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले तसेच भविष्यातही शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ही बाल वारकरी शिक्षण दिंडी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.


 
Top