भूम (प्रतिनिधी)- देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भूम शहरातील साळीवाडा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पहाटेपासूनच मंदिरात विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर भजन, अभिषेक, आरती, हरिपाठ आणि फराळ प्रसाद वाटप अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकडा आरतीने झाली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. सकाळपासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, संजय गाढवे तसेच उद्योजक विनोद जोगदंड यांच्या पत्नी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल“ आणि “ज्ञानोबा-तुकाराम“ यांच्या जयघोषात विठ्ठलाचे दर्शन घेतले. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात भूम शहरातील महिला भजनी मंडळांनी विठ्ठल नामाचा गजर करत सुमधुर भजन सेवा सादर केली. सायंकाळी हरिपाठाने दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवसभर भाविकांसाठी मोफत फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आषाढी वारीचा आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती, सेवेकरी व विठ्ठल भक्तांनी परिश्रम घेतले.
