भूम (प्रतिनिधी)-  भूम नगरपरिषदेत काही नगरसेवकांकडून प्रशासकीय कामकाजात सातत्याने अडथळे निर्माण होत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव, धमक्या आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.  मुख्याधिकारी, नगरपरिषद भूम यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र पाठविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाकडून 28 जुलै 2026 रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात मुख्याधिकारी नगरपरिषद, भूम यांनी केलेल्या तक्रारीचा उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार नगरपरिषद सदस्य रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे व पवार हे नगरपरिषद कार्यालयात वारंवार उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकतात. तसेच कार्यालयात आरडाओरडा करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे असे प्रकार घडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात या सततच्या प्रकारांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कार्यालयीन कामकाज करणे अवघड झाले आहे. तसेच स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

 
Top