कळंब (प्रतिनिधी)- आयुष्यभर स्वतःला झिजवत ज्या गुरुजनांनी आपल्याला ज्ञानदान केले. त्या गुरुंबद्दल प्रत्येकाने कृतज्ञतेची भावना बाळगली पाहिजे. ज्ञानाची गंगा सामान्य माणसापर्यंत सहज, सोप्या भाषेत पोहोचविणारे महर्षी व्यास यांचे स्मरण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण करतो. आजच्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि सन्मार्गावर चालण्यासाठी सद्गुरूंच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी केले.
डिकसळ येथे बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भव्य-दिव्य पारंपरिक गुरुमंत्र सोहळा व गोपाळकाला कीर्तनसेवेच्या प्रसंगी ते उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व, संतांच्या विचारांचे आचरण आणि समाजजीवनात अध्यात्माची आवश्यकता यावर सविस्तर विवेचन केले.
डिकसळ येथे दरवर्षी पारंपारिक गोपाळ काल्याचे आयोजन केले जाते . सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरात पारंपरिक भारुडाचा कार्यक्रम पार पडला. तर दुपारी दोन ते चार यावेळेत गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थितांना काला वाटप करण्याचा मान असलेले मानकरी विशाल महाराज बोधले यांना खास पद्धतीने गोपाळ गड्यानी खांद्यावर घेतले त्यानंतर डोक्यावर काल्याची हंडी घेऊन भाविकांना गोपाळ काल्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे उत्तराधिकारी हभप. परमेश्वर महाराज बोधले, हभप बाळासाहेब महाराज बोधले हभप. अण्णा महाराज बोधले, रामेश्वर महाराज बोधले, विजय बोधले,अशोक काटे, ओंकार कदम, जनक जाधव ,रामदास काळे, संजय काटे, डिगांबर खंदारे, सौदागर काळे, समाधान जाधव, भागवत कदम, अनंत अंबिरकर सचिन बोधले, विलास महाराज बोधले,मुकुंद बोधले आदि तरुण मंडळी व ग्रामस्थांनी विशेष परीश्रम घेतले .या कार्यक्रमासाठी पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला उपस्थित होते.
शेकडो भाविकांनी घेतला गुरुमंत्र
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी येथील श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेत ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले व संस्थनाचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराज बोधले यांच्या कडून गुरुमंत्र घेतला . सकाळी आठ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती . यावेळी संस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

