भूम (प्रतिनिधी)-  तेरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना फिनट्री एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीतून मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ॲड. उल्का प्रदीप जैन यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, दप्तर, टी-शर्ट, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्याची अडचण भासणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. 'शिक्षणाला बळ आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात' देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमास भूम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. संयोगिताताई संजय गाढवे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा परिषद सदस्य विकी दादा चव्हाण, पंचायत समिती सदस्या पूनम बालाजी घोलप, पत्रकार अजित बागडे, पत्रकार आशिष बाबर, पत्रकार तानाजी सुपेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फिनट्री एज्युकेशन प्रा. लि. आणि ॲड. उल्का प्रदीप जैन यांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला.


 
Top