वाशी (प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावी, एनएमएमएस, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी (ता. 28) कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रुपयांची रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर येथील डॉ. विवेकानंद चेडे तसेच जर्मनी येथे आयटी अभियंता म्हणून कार्यरत असलेले ज्ञानदेव गरड उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सई डिसले हिने 100 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्ञा डोरले हिने 99.20 टक्के गुणांसह द्वितीय, तर कुंजल नलवडे हिने 99 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह एनएमएमएस, नवोदय आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी पी. टी. पाटील, डॉ. विवेकानंद चेडे आणि संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेवरच नव्हे, तर संस्कार, सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आयुष्यात मोठे यश संपादन करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी त्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, मुख्याध्यापक सुहास थोरबोले, संतोष माने, दत्तू घुमरे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुहास थोरबोले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रुपाली गिरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन जी. एम. देशमुख, एस. एस. धारकर आणि सुनील क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता गुणवंत विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात गौरव करून आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

 
Top