धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शम्स चौकाजवळील गाझी स्कूलसमोर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात गुटखा शिफ्ट करताना पोलिसांनी आरोपीला पकडले. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, महिंद्रा पिकअप आणि इनोव्हा गाडी असा एकूण 17 लाख 82 हजार 297  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील शम्स चौक परिसरात एका टोयोटा इनोव्हा गाडीमधून अवैध गुटखा आणून, त्याची अन्य ठिकाणी बेकायदेशीर विक्री करण्यासाठी दुसऱ्या वाहनात शिफ्टींग केली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच गाझी स्कूलजवळ अचानक छापा टाकला. सदर छाप्या दरम्यान आरोपी सलमान गुलाम शेख, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव हा इनोव्हा चारचाकी क्रमांक एम एच 24 व्ही 1642 मधून गुटख्याचे गोणी काढून महिंद्रा मालवाहतूक पिकअप क्रमांक एम एच 12 एस एफ 4070 मध्ये शिफ्ट करत असताना रंगेहात पकडला गेला. याच्या ताब्यामध्ये मिळून आलेल्या गोणीमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची पॉकेट मिळून आले. त्यामध्ये बादशहा गुटखा, विमल पान मसाला व व्हीआय तंबाखूचे विविध पॅकेट्रस, गोवा 1000, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, राजनिवास पान मसाला, झाफराणी जर्दा, रत्ना छाप तंबाखू आणि इतर तंबाखू पॉकेट, महिंद्रा पिकअप क्र. एमएच 12 एसएफ 4070, व टोयोटा इनोव्हा गाडी क्र. एमएच 24 व्ही 1642 असा एकूण 17 लाख 82 हजार 297 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे आरोपीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन कायदा तसेच अन्न सुरक्षेच्या संबंधित कलमांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली परीक्षावधीन पोलीस उप अधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोउपनि अक्षय डिघोळे, सपोफौ कऱ्हाळे, पोअं जाधवर, चालक पोहेकॉ रणनवरे आणि पोअं नाईकवाडी यांच्या पथकाने यशस्वतीरीत्या पार पाडली आहे.

 
Top