धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यंदा जागतिक आरोग्य संघटनेने "Hepatitis: Let's Break It Down" हे घोषवाक्य दिले असून,केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात जनजागृती रॅली काढून हिपॅटायटीस आजाराविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणारा राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित असून,या कार्यक्रमांतर्गत हिपॅटायटीस बी व सीची तपासणी तसेच मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक हिपॅटायटीस दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयात 27 जुलै 2026 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ओरिएंटेशन अँड रिव्ह्यू बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीस विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी स्क्रीनिंग टेस्ट व लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.तसेच हिपॅटायटीस बी व सी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची व्हायरल लोड तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
याशिवाय क्षयरोग उपचार घेत असलेले रुग्ण, कारागृहातील बंदी,थॅलेसेमिया व हिमोफिलिया रुग्ण,गर्भवती महिला,उच्च जोखमीच्या गटातील व्यक्ती,रक्तपेढी तसेच डायलिसिस उपचार घेत असलेले रुग्ण यांचीही नियमित तपासणी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
जिल्ह्यात हिपॅटायटीसविषयी जनजागृती वाढविणे,वेळेत तपासणी करून रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना देणे,हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.