तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर शहरातील घाटशिळ पार्किंग परिसरात उभी असलेल्या स्कॉडा कारची काच फोडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज सदानंद मडीवाळ (वय 29, रा. चिंचवाडा गाव पाली, ता. बिचोली नॉर्थ, जि. नॉर्थ गोवा) यांनी 19 जुलै रोजी आपली स्कॉडा स्लाव्हिया (क्र. जीए 04 ई 9156) ही कार तुळजापूर येथील घाटशिळ पार्किंगमध्ये, स्मशानभूमी रोडवरील इदगाहजवळ उभी केली होती. सकाळी 11.30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूची काच फोडून पर्समधील 1.50 लाख रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती..

गुन्ह्याचा तपास सुरू असताना  मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोज महादेव धोत्रे (रा. वेताळ नगर, तुळजापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीतील काही मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. पंचनामा पोलीस उपनिरीक्षक थोटे यांनी केला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी आणि बळीराम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 
Top