धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेची ओळख निर्माण व्हावी तसेच संतांचे विचार आणि भक्तीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने भक्तिमय दिंडीचे आयोजन करण्यात आले.

या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमांसह मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. संपूर्ण गावातून “ज्ञानोबा-तुकाराम“, “पांडुरंग हरी“, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल“ अशा गजराने परिसर दुमदुमून गेला.

यावेळी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी विठुरायावरील सुंदर भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुरेल गायनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. दिंडी मद्ये आळणी शाळेचे सर्व शिक्षक ही सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दिंडीमध्ये शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच आळणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. वारकरी परंपरेतील समता, भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक मूल्यांविषयी आदर निर्माण झाला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमुळे शाळा आणि गाव परिसरात आनंद, उत्साह आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी श्री दिनेश पेठे श्री हनुमंत माने राजेंद्र दीक्षित राधाबाई वीर, स्वाती मुपडे, जया नवले, सुमन इंगळे, सखुबाई कदम, नेहा भंडारे, महादेवी सावळकर अश्विनी भांगे यांनी परिश्रम केले.


 
Top