धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव येथील कै.यशवंतराव सभागृहात आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात दिलेले योगदान, तसेच सर्वसामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी तुकाराम भालके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे खातेप्रमुख/विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली वाहत त्यांच्या कार्याचा उजाळा दिला. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांनी शांत, संयत आणि आदरयुक्त वातावरणात सहभाग नोंदवला. सर्वांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
