परंडा (प्रतिनिधी)- सन 2025-2026 गाळप झालेल्या ऊसाला जाहिर केलेल्या दराप्रमाणे साखर कारखान्यांनी संपूर्ण रक्कम अदा करावी.या मागणीचे निवेदन साखर आयुक्त डॉ.संजय कोलते ( पुणे ) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी बुधवारी ( दि.15 ) दिले. यावेळी सावरगाव ( ता.भूम ) माजी सरपंच बापूराव बोराडे ,मनसे भूम तालुका उपाध्यक्ष कुमार इंगवले, माणकेश्वर शाखा अध्यक्ष रोहन अंधारे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की ऊस गाळप हंगाम सन 2025-2026 गाळप झालेल्या ऊसाला कारखान्यांनी जाहिर केलेल्या दाराप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम अदा करावी संपूर्ण रक्कम न देणाऱ्या चेअरमन व कारखानदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी . भैरवनाथ शुगर, आयान तथा बाणगंगा, इंद्रेश्वर, विठ्ठल शुगर, विठ्ठलराव सहकारी, कुर्मदास, बबनराव शिंदे शुगर केवड, कमलाई आदि साखर कारखान्यांनी परंडा तालुक्यातील ऊस उचलला आहे . या कारखानदारावर आपल्या स्तरावरून चौकशी करून कार्यवाही करावी.गळीत हंगाम 2025-26 मध्ये गाळप केलेल्या अनेक कारखान्यांनी किफायतशीर ऊस दर दिलेला नाही. आपल्याच कारखान्याला ऊस मिळावा म्हणून 2800 ते 3100 रुपये दर जाहिर केला परंतू संपूर्ण रक्कम दिली नाही . शेतकऱ्यांनी ऊस गाळपास दिल्यानंतर त्याच्या उसाच्या उत्पादनापोटी असलेली रक्कम विहित मुदतीत म्हणजेच 14 दिवसात देण्यासाठी एफआरपीमध्ये कायदेशीर तरतूद ऊस (नियंत्रण) आदेश करण्यात आलेले आहेत, असे असताना देखील कारखानदारांनी ऊस गाळप ची रक्कम शेतकऱ्यांना विहित मुदतीत अदा केलेली नाही, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या कालावधीत गाळप केलेल्या ऊसाचे शेतकऱ्यांना अद्याप रक्कम दिलेली नाही.तसेच ज्यांनी दिली आहे ,त्यांनी जाहिर केल्याप्रमाणे न देता प्रति टन 400 ते 500 रुपये कमी दिले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .संबंधित कारखानदारांनी शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम तात्काळ द्यावी . 7 महिने झाले तरी रक्कम अदा केलेली नाही .
