धाराशिव (प्रतिनिधी)- शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे धाराशिव शहरात सकाळी आगमन झाले. त्यावेळी नगरपरिषदेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करताना नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे व नगरसेवक राहुल काकडे, न. प. उपमुख्याधिकारी अभिजीत गोरे आदींनी उत्साहापूर्ण वातावरणात स्वागत केले.
सकाळच्या उल्हासदायक वातावरणात मोठ्या प्रमाणात भक्तांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर मंदिर येथे जी थ्री आर्ट यांच्यावतीने आकर्षक रागोळी काढण्यात आली होती. यावेळी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे यांनी गजानन महाराज पालखीचे पुजन करून सर्वांचे स्वागत केले. पालखी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात विसावा घेवून भोजन केले. त्यानंतर पालखी सकाळी 11 वाजता तेथून निघाली. पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने धाराशिव शहर प्रदिक्षणासाठी पालखी शहरात गेली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फुलाची सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. तर शहरात श्री गजानन महाराज पालखीसाठी स्वागतासाठी विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होता.
श्री गजानन महाराज पालखी दिंडीमध्ये 700 वारकरी, तीन अश्व, दोन रूग्णवाहिका, तीन ट्रक, दोन पाण्याचे टँकर, इतर दोन वाहने या प्रमाणे दिंडीमध्ये समावेश होता. धाराशिव शहरात बुधवारचा मुक्काम असून, गुरूवारी पहाटे श्री गजानन महाराज पालखी तुळजापूरकडे रवाना होणार आहे.