धाराशिव (प्रतिनिधी)-  येडशी-बार्शी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवालास  पुढील तीन महिन्यांत मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिली असल्याची माहिती आमदार तथा मित्रचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची बुधवारी भेट घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार राजाभाऊ राऊत  यांनी येडशी-बार्शी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी  या मार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तातडीने मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता द्यावी, आवश्यक निधी उपलब्ध करून कामाला लवकर प्रारंभ करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. धाराशिव जिल्हा हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून तुळजाभवानी मंदिरामुळे राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. तसेच जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणूनही निवड झाल्यानंतर विविध विकास प्रकल्पांना गती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दळणवळणाची सक्षम व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व राजाभाऊ राऊत यांनी या निवेदनात नमूद केले.

टेंभुर्णी-लातूर हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आणि लातूर या शहरांमधील वाढती वाहतूक, कृषी व औद्योगिक विकास लक्षात घेता या मार्गाचे चौपदरीकरण अत्यावश्यक बनले आहे. येडशीलातूर या टप्प्याचे काम सुरू असले तरी टेंभुर्णी ते येडशी या उर्वरित भागाचेही तातडीने चौपदरीकरण करण्याची गरज असल्याचे आमदार पाटील व राजाभाऊ राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी एनएच-548-सी अंतर्गत टेंभुर्णीकुर्डुवाडीबार्शीकुसळंब तसेच एनएच-63 अंतर्गत कुसळंबयेडशी या मार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा  पुढील तीन महिन्यांत मंजूर करण्यात येईल. त्यानंतर त्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व राजाभाऊ राऊत यांनी सांगितले आहे.


व्यापार, उद्योग, शेतीसह धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

या महामार्गावरील प्रमुख गाव असलेल्या येडशी येथे 'वन टाइम इम्प्रूव्हमेंट' योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येडशी येथील ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्ते राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, व्यापार, उद्योग, शेती, धार्मिक पर्यटन आणि एकूणच प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.


 
Top