येरमाळा (प्रतिनिधी )- कळंब तालुक्यातील बांगरवाडी गावच्या एकमेव संपर्क रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, पावसामुळे सुमारे 2600 मीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार घसरत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी बांगरवाडीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी व दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

येरमाळा ते बांगरवाडी या साडेचार किलोमीटर रस्त्यापैकी 2600 मीटर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 30-54 योजनेतून मंजुरी मिळाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण न करता,मजबुतीकरणासाठी निकृष्ट दर्जाचा मुरूम टाकल्याने रस्त्यावर दलदल निर्माण झाली आहे. रस्त्यावर खोल चिखल साचल्याने दुचाकी घसरत आहेत,तर चारचाकी वाहनेही अडकण्याचे प्रकार घडत आहेत.

या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,महिला व नोकरदारांची ये जा सुरू असते. विशेषतः एखादा रुग्ण चारचाकीतून किंवा रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेताना वाहन घसरून गंभीर अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे मजबुतीकरण पूर्ण करून दर्जेदार खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात बांगरवाडीचा संपर्क धोक्यात येण्याबरोबरच एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रशासनावर राहील,असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


रस्याचे कामाला मंजुरी मिळाल्यापासून काम चालु केले,मजबुती करणाचे दोन स्तर झाले असुन मुरुम मजबुतीसाठी व्हायब्रेटर रोलरणे दबई केल्याने रस्त्यावर चिखल होतं आहे.चिखल होईल त्या ठिकाणी आणखी मुरुम टाकून होणारी गैरसोय दूर करण्यात येईल.

राजाभाऊ बांगर.

सरपंच ग्रामपंचायत बांगरवाडी.

 
Top