धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी (आ.) महसूल मंडळातील पात्र शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य  ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राज्याचे कृषीमंत्री  दत्तात्रेय भरणे यांनाही ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे.

सन 2025 खरीप हंगामातील पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मंजूर झाला असताना, पाडोळी (आकुबाई) मंडळातील सारोळा, चिखली, राजुरी, कामेगाव, बोरगाव, सांगवी, समुद्रवाणी, लासोना, मेंढा, घुगी, येवती व नितळी या भागांतील अनेक पात्र शेतकरी तांत्रिक कारणांमुळे अद्याप लाभापासून वंचित असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक कारणांमुळे पिक विम्यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे नमूद करत, संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा व सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी  ॲड.गुंड यांनी केली आहे. यावेळी रुपामाता परिवाराचे राजेंद्र सुर्यवंशी, अमोल गुंड, गजानन पाटील व अनिकेत नवले उपस्थित होते. 


 
Top