भूम (प्रतिनिधी)-  आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांना यंदाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका बसत असून, सरमकुंडी-कुंथलगिरी-भूम-कुर्डूवाडी या पालखी मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासन वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असताना, पालखी मार्गाची दुरवस्था मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

आषाढी वारीसाठी आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखीसह सुमारे 200 ते 250 छोट्या-मोठ्या दिंड्या या मार्गाने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जातात. हजारो वारकरी या मार्गावरून पायी प्रवास करतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी खडी उघडी पडल्याने चालणेही कठीण झाले आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक संस्था तसेच अखिल भारतीय वारकरी महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा निवेदने देऊन पालखी आगमनापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप वारकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 
Top