धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील खरीप 2025 हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकरी बांधवांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्राच्या तांत्रीक सल्लागार समितीने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय कायम ठेवला आहे. निर्णय म्हणजे धाराशिवच्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि न्यायाचा विजय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे 14 मंडळ वगळले गेले आहेत. त्याबाबत लवकरच बैठक बोलवावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. 

आमदार कैलास पाटील म्हणाले की, केंद्रीय समितीने आपल्या आदेशात विमा कंपनीचे अपील ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक निकष आणि प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य समितीचा निर्णय कायम ठेवत पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत पीकविमा रक्कम अदा करण्याचे स्पष्ट आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या आदेशाचे पालन करण्यात विमा कंपनीने टाळाटाळ केल्यास तिच्यावर आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही केंद्रीय समितीने दिला आहे.

 
Top