धाराशिव (प्रतिनिधी)- भारताच्या कारगिल भागात सन 1999 मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शूर सैनिकांनी अद्वितीय साहस,शौर्य आणि धाडसाच्या बळावर परतवून लावत ऐतिहासिक विजय मिळविला.या विजयाला 27 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 26 जुलै 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने 27 वा कारगिल विजय दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा तसेच अपंग जवानांचा विविध स्तरावर गौरव करून शासन आणि समाजातर्फे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.शूर वीरांच्या अतुलनीय त्यागामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित राहिले असून,त्यांच्या बलिदानाची आठवण समाजाला करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परिसरातील शहीद जवान स्मारक (अमर जवान) येथे मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

यावेळी वीरपत्नींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित माजी सैनिक,माजी सैनिकांच्या विधवा व अवलंबितांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ अधिवक्ता विश्वजीत शिंदे होते.तर नालसा वीर परिवार सहायता योजना अंतर्गत अधिकार मित्र अशोक गाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्ह्यातील 4 वीरपत्नी,38 माजी सैनिक,माजी सैनिकांच्या विधवा व अवलंबित, तसेच विविध कार्यालयांतील 9 माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक ऋत्विज क्षीरसागर यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महादेव पांचाळ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top