धाराशिव (प्रतिनिधी)- गरजू, होतकरू, उद्योजक तसेच एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढावा या उद्देशाने पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. छोट्या व्यावसायिकांनी सचोटीने व्यवसाय करत संस्थेवर दाखविलेला विश्वास हीच संस्थेची खरी ताकद आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रियदर्शिनी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन बुधवार 29 जुलै रोजी आयोजन केले होते. त्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.  सभेला उद्योजक अनिलकुमार अजमेरा, सहकार खात्याचे अधिकारी जाधव, सहायक निबंधक कार्यालयाच्या आशा कांबळे, तज्ज्ञ संचालक तथा सीईओ डी. जी. कुलकर्णी, कनिष्ठ अधिकारी कांचनमाला कांबळे, पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. शहापूरकर म्हणाल्या की, महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेली प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्था अल्पावधीतच विश्वासार्ह आर्थिक संस्था म्हणून नावारूपाला आली असून, अवघ्या पाच वर्षांत संस्थेने उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली आहे. सलग दोन वर्षे नफ्यात राहिलेल्या संस्थेला लेखापरीक्षणात 'अ' वर्गवारी प्राप्त झाली असून, संस्था आता एक कोटी रुपयांच्या ठेवींकडे वाटचाल करीत आहे. यावेळी पोस्टल कर्मचारी पतसंस्थेचे माजी संचालक अरविंद देशपांडे, व्यंकट पवार, श्रीहरी शिवलकर, कांता शिंदे, अलका वीर, मंजुषा शिंदे, अविज शेख यांच्यासह संस्थेचे सभासद व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top