वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील दसमेगावकळंबपुणेमांडवा मार्गावरील एसटी बससेवा मागील सुमारे एक वर्षापासून बंद असल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बससेवा तातडीने पूर्ववत करावी, तसेच पारगाव बायपासऐवजी गावातून एसटी बसगाड्या चालवाव्यात, अशी मागणी विभागीय अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तर नागरिकांना शासकीय कार्यालये, रुग्णालये व बाजारपेठेत जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यांचा अतिरिक्त आर्थिक भार वाढला आहे. तसेच पारगाव बायपासमार्गे जाणाऱ्या बसगाड्या गावातून चालवल्यास विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे युवा नेते ॲड. महेश आखाडे, शुभम मोरे, प्रकाश मोटे, स्वप्नील उगडे, अक्षय लगडे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने बससेवा सुरू करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
