धाराशिव (प्रतिनिधी)-   प्रशासन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असेल,तर शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतो.‌‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांना दिला जात असून,शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

‌‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिराअंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय समाधान व महाआरोग्य शिबिर तुळजापूर येथील वंश मंगल कार्यालयात उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात सुमारे 1,400 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख,धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम,जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सिद्धेश्वर कोरे,नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार मृणाल जाधव, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी जाधवर, अपर तहसीलदार पुरुषोत्तम कोकरे, अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड,निवासी नायब तहसीलदार प्रियंका लोखंडे तसेच सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि समन्वय पथकाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन संजय मैदर्गी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी मानले.

 
Top