उमरगा (प्रतिनिधी)- जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार प्रत्येक घराघरांत आणि जनमानसांत रुजल्याशिवाय सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आभासी संस्कृतीच्या प्रभावामुळे जीवनातील वास्तव हरवत असून महिलांच्या आशा-आकांक्षांना समाजात योग्य स्थान मिळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांनी केले.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या धाराशिव जिल्हास्तरीय महाअधिवेशनाचे उद्घाटन रविवारी उमरगा येथील कैलास शिंदे मंगल कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते झाले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जिजाऊ वंदनेने अधिवेशनाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष बाळासाहेब माने यांच्यासह विभावरी ताकट, वर्षाताई माने, रंजनाताई हासुरे, वैशाली कडू, स्वातीताई पवार, राधाताई कडावकर, अर्जुन तनपुरे, भास्कर वैराळे, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आणि आयोजक जिल्हाध्यक्षा रेखाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी अर्चनाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके यांनी सर्व निवडणुकांमध्ये महिलांना शंभर टक्के आरक्षण दिल्यास सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडू शकते, असे ठाम मत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक प्रेमकुमार बोके यांनी अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रभावावर कठोर भाष्य करत महिलांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा स्वीकारण्याचे आवाहन केले. समारोप सत्रात अध्यक्षस्थानी आशाताई मोरजकर होत्या. प्रमुख व्याख्यात्या ॲड. वैशाली डोळस यांनी महिलांना मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्षा रेखाताई पवार यांनी प्रास्ताविक केले. लताताई बावणे यांनी सूत्रसंचालन तर मंजुषा बलसुरे यांनी आभार मानले.
