भूम (प्रतिनिधी)-  अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 4 जुलै रोजी केलेल्या धडक कारवाईनंतर भूम तालुक्यातील कथित दूध भेसळ प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले आहे. बाळासाहेब घोडके यांच्यासह सात जणांवर कारवाई करण्यात आली असून, एमआयडीसी परिसरातील हाके प्रोड्युसर कंपनीच्या दूध संकलन केंद्राचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी होत आहे. 

तपास यंत्रणेकडे उपलब्ध झालेल्या खरेदी-विक्री नोंदीनुसार, 1 डिसेंबर 2025 ते 29 मे 2026 या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 272 जणांनी तब्बल 2 कोटी 88 लाख 9 हजार 772 रुपयांची दूध पावडर खरेदी केल्याची नोंद समोर आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती केवळ एका विक्रेत्याशी संबंधित असून, इतर विक्रेत्यांच्या व्यवहारांचाही तपास सुरू आहे. 

जप्त करण्यात आलेल्या दूध पावडरचा नेमका वापर कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असला, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील व्यवहारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर भेसळ सिद्ध झाली, तर हा प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी झालेला गंभीर खेळ ठरेल. आणि जर भेसळ सिद्ध झाली नाही, तर कोट्यवधी रुपयांची ही पावडर नेमकी कुठे आणि कशासाठी वापरण्यात आली, याचेही उत्तर तपास यंत्रणेला द्यावे लागणार आहे.

 
Top