कळंब (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कळंब तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज कळंब तहसीलदार यांना विविध शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये प्रमुख दोन मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्री केंद्रातून खरेदी केलेल्या बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित बियाण्यांची तात्काळ चौकशी करून पंचनामा करण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, पीकविमा योजनेत नव्याने लागू करण्यात आलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे सुलभ पद्धतीने पीकविमा उपलब्ध करून द्यावा. तसेच अल्प दरात पीकविमा भरता यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढील काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब कथले, युवक तालुकाध्यक्ष भीमा हगारे, माणिकराव जाधव ,भरत शिंदे ,सलमा सौदागर सुंदर बापू लोमटे, आत्माराम बिक्कड, बळवंत पवार, लक्ष्मण शिंदे, चेतन वाघमारे, विकास यादव,विठ्ठल कोकाटे, अफताब तांबोळी, समाधान वाघमारे,संकेत घोलप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top