तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात देशाचे भविष्य दडलेले असते. मात्र, शेतकऱ्यांच्या कष्टांची खरी जाणीव प्रत्यक्ष शेतात उतरल्याशिवाय होत नाही. याच भावनेतून आज आमच्या शेतीची जबाबदारी सांभाळणारे शेतकरी  विष्णू पवार आणि त्यांची जिवलग बैलजोडी ‌‘बदाम्या' व ‌‘उल्हाशा' यांच्या समवेत शेतातील सोयाबीन कोळपणीच्या कामात सहभागी होत शेतीतील श्रम, संघर्ष आणि समर्पणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

सोयाबीन पिकातील कोळपणी करताना कडक उन्हाचा तडाखा, मातीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत शेतकरी दिवस-रात्र कष्ट करत असल्याचे वास्तव जवळून अनुभवता आले. प्रत्येक घामाच्या थेंबामागे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची धडपड, पिकांच्या भवितव्याची चिंता आणि देशाच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी दडलेली असल्याची तीव्र जाणीव झाली. आज आपल्या ताटात सहजपणे येणाऱ्या प्रत्येक अन्नाच्या दाण्यामागे शेतकऱ्याचा त्याग, संघर्ष, संयम आणि अथक परिश्रम दडलेले आहेत. वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, बदलते हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील अनिश्चितता अशा अनेक संकटांचा सामना करतही शेतकरी देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अविरत परिश्रम घेत आहे.

यावेळी विष्णू पवार यांच्या कष्टाळू वृत्तीचे तसेच त्यांच्या विश्वासू बैलजोडी ‌‘बदाम्या' आणि ‌‘उल्हाशा' यांच्या योगदानाचे विशेष कौतुक वाटले. त्यांच्या समवेत केलेल्या श्रमातून शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून संस्कृती, परंपरा, श्रमसंस्कार आणि जीवनमूल्ये जपणारी जीवनशैली असल्याची भावना अधिक दृढ झाली. “शेतकऱ्याचा घाम हा केवळ पाण्याचा थेंब नसतो, तो देशाच्या समृद्धीचा पाया असतो. अन्नदात्याचा सन्मान करणे, शेतीचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचा आदर राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.“ या श्रमअनुभवातून शेती आणि शेतकरी यांच्याविषयीचा आदर अधिक वृद्धिंगत झाला असून, समाजातील प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी शेतात जाऊन अन्नदात्याच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक आहे.

 
Top