धाराशिव (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस), तुळजापूर कॅम्पस येथे प्रा. बाळ राक्षसे यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक विकास कार्यक्रम अंतर्गत केरळ, बिहार, दिल्ली, राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि महाराष्ट्र या 11 राज्यांतील प्राध्यापकांनी धाराशिव जिल्ह्यातील जकेकुरवाडी या आदर्श गावाला अभ्यास भेट देत ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

यावेळी सरपंच अमर सूर्यवंशी म्हणाले, “गावाचा विकास हा केवळ शासनाच्या निधीवर नव्हे, तर लोकसहभाग, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि ज्ञानाधारित नियोजनाच्या एकत्रित प्रयत्नातून घडतो. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर यांच्या सहकार्यामुळे गावाला शास्त्रीय दिशा, संशोधनाधारित मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य मिळाले. त्यामुळे जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, शिक्षण, ग्रामशासन आणि शाश्वत विकासाच्या विविध क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबविता आले. 

यावेळी गणेश चादरे यांनी सांगितले की, गावांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि ग्रामसमाज यांच्यातील ज्ञानाधारित भागीदारी अत्यावश्यक आहे.  मुक्त संवाद सत्रात विविध राज्यांतील सहभागी प्राध्यापकांनी आपल्या-आपल्या राज्यांतील ग्रामीण विकासाच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. याप्रसंगी डॉ. ईशान जनबंधू यांनीही ग्रामीण विकासासाठी ज्ञानाधारित भागीदारी, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनाचे महत्त्व अधोरेखित करत आपले विचार मांडले. प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. सबलू खान यांनी आभार मानले. महेश माने व जकेकुरवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top