धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा परिषद पंचायत समिती परिसरातून समता नगरकडे जाणारा सार्वजनिक रस्ता पुन्हा एकदा सत्तेच्या अहंकाराचा बळी ठरत आहे.
महिनाभरापूर्वी तारेचे कुंपण घालून बंद करण्यात आलेला रस्ता नागरिकांनी स्वतःच्या हिमतीवर खुला केला. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने बंद पडलेली चारचाकी वाहने उभी करून नागरिकांच्या मार्गात पुन्हा अडथळा निर्माण केला. मात्र आज सकाळी तर या प्रकाराने सर्वच मर्यादा ओलांडल्या. चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बंद वाहने उभी करून प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्या वाहनांवर जिल्हा परिषदेसमोरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून, जिल्हा परिषद प्रशासनाने तो वापरू नये,असे पोस्टरही झळकले.
ही वाहने कोणी उभी केली, याचा उलगडा अद्याप झालेला नसला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी राजकीय अहंकाराचे प्रदर्शन सुरू आहे. जनतेला रस्ता हवा आहे, राजकीय हट्ट नाही. विकासाच्या नावाने मते मागणारे आज जनतेचाच मार्ग बंद करत असतील, तर त्यापेक्षा मोठे अपयश कोणते? लोकांच्या कराच्या पैशातून उभ्या राहिलेल्या यंत्रणाच जर लोकांचा रस्ता अडवत असतील, तर ही लोकशाहीची विटंबना आहे. आता जनता शांत आहे म्हणजे असहाय्य नाही; योग्य वेळी हाच जनतेचा रोष मतपेटीतून उत्तर देईल. रस्ते अडवून जनतेचा आवाज दाबता येत नाही, उलट जनतेच्या मनात सत्तेविरोधातील रस्ता अधिक रुंद होत जातो.

