धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जेष्ठ साहित्यिक गझलकार युवराज नळे यांच्या गझलेचा समावेश करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून महाविद्यालयांतून बी.ए., बी कॉम, बीएससी च्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात युवराज नळे यांची गझल असणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या मान्यतेने व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ सर्जेराव जिगे यांच्या स्वाक्षरीने मान्यता मिळालेल्या अभ्यासक्रमात युवराज नळे यांची गझल समाविष्ट करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात जेष्ठ साहित्यिक युवराज नळे यांचे मोठे योगदान असून इतर अनेक साहित्य संमेलनासह दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. सध्या त्यांच्या नावाने तेरा ग्रंथ प्रकाशित असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये सहा रिसर्च पेपर ही प्रसिद्ध झाले आहेत. अखिल भारतीय स्तरावर व राज्य स्तरावरील आजपर्यंत पंधरा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून सध्या ते अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती संस्थेच्या देवगिरी प्रांत संघटन मंत्री म्हणून साहित्य सेवा करत आहेत. त्यांनी आजपर्यंत सहाशे पेक्षा जास्त गझल लिहिल्या असून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात युवराज नळे यांची गझल समाविष्ट झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top