उमरगा (ंप्रतिनिधी)- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांचे पक्षांतर नसून ती घरवापसी असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यांच्यावरील गद्दारीचे आरोप हास्यास्पद आहेत. सचिन वाजे सारख्यांकडुन खंडणी गोळा करण्याचे धंदे बंद पडल्याने उद्धव ठाकरे यांचा तीळ पापड होतोय. प्रत्येक ठिकाणी जायचं आणि गद्दारीचा आरोप करायचा. आमचे नेते एकनाथ शिंदे यांना गद्दारीचे शिरोमणी वगैरेची भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरावी. उलट उद्धव ठाकरे हेच गद्दारीचे मेरूमणी आहेत. महायुतीच्या मंगळसूत्रावर निवडून येऊन 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाशी तडजोड करत काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचा “राजकीय व्यभिचार“ उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर गद्दारीचा खरा कलंक उद्धव ठाकरे यांनी लावला आहे. अशा परखड शब्दात शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आरोप करत टीका केली.
उमरगा शहरात ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि 28) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिप उपाध्यक्षा उषा गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समिती सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे आदी उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आणि आता सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे करणे म्हणजे “वरातीमागून घोडे नाचवण्या सारखे“ असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा “घोडं, शिंगरू आणि दुतोंडी गांडूळ“ असाही त्यांनी उल्लेख केला. खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेल्या वक्तव्यांचा वाघमारे यांनी समाचार घेतला. राऊत यांनी शिवराळ आणि खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे ठाकरेच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी सर्वांसमोर उघडी पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी राऊताना आवर घालावा, त्यांच्या वागण्याला आणि भाषेला कंटाळून पक्षातील अनेक निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळेच पक्षालाच कुलूप लागण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.
