धाराशिव (प्रतिनिधी)- भुम तालुक्यातील हाडोंगी येथील संजय पोपट वाघमारे यांनी त्यांच्या भाचीवर झालेल्या कथित अन्यायाविरोधात आज (30 जून) सकाळपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
संजय वाघमारे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, वाणेवाडी येथील संबंधित कुटुंबाने त्यांच्या मुलाबाबत महत्त्वाची माहिती लपवून ठेवत त्यांच्या भाचीशी विवाह लावून दिला. त्यानंतर विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला असून तिची बदनामीही करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.याप्रकरणी 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच आनंदनगर पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने विवाहितेला न्याय व तिचे कायदेशीर हक्क मिळावेत, या मागणीसाठी 30 जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विवाहितेला न्याय मिळावा तसेच तिच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
