तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्रस्तावित धार्मिक विधी आणि त्यासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर विरोधाचा सूर उमटू लागला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, तुळजापूर तालुका यांनी स्वतंत्रपणे निवेदने देत मंदिर प्रशासनाने धार्मिक कर्मकांडांपेक्षा भाविकांच्या सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे.

शेकापचे उत्तम अमृतराव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , श्री तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी असून भक्तांच्या श्रद्धेवर कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत, विकासकामे प्रलंबित असताना नव्याने धार्मिक विधी करून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, रिपाई आघाडी अध्यक्ष  शुभम कदम यांनीही निवेदनाद्वारे मंदिरातील निधी धार्मिक कर्मकांडांवर खर्च करण्याऐवजी भाविकांच्या मूलभूत सुविधांवर खर्च करावा, अशी मागणी केली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, पार्किंग, निवास व्यवस्था आणि इतर विकासकामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

दोन्ही संघटनांनी 21व्या शतकातील वैज्ञानिक युगात भारतीय राज्यघटनेने अपेक्षित असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याची गरज अधोरेखित केली आहे. प्रशासनाने अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देऊ नये, अशी भूमिकाही निवेदनांत मांडण्यात आली आहे. शेकापच्या निवेदनात दर्शन मंडपात कायमस्वरूपी उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त करणे, नवरात्रोत्सवातील पारंपरिक धार्मिक विधी सुरू ठेवणे; मात्र नव्याने खर्चिक धार्मिक प्रथा सुरू न करणे, तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांना समान संधी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रस्तावित धार्मिक विधी रद्द करून मंदिरातील निधी विकासकामांसाठी वळवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. रिपाइं (आठवले) युवक आघाडीनेही मंदिर प्रशासनाने तातडीने या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

 
Top