तुळजापूर (प्रतिनिधी)- सोलापूर तीर्थक्षेत्र तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ गावजवळ उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पुलाच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या दगडी शिळा, गोटे तसेच मांजरा दगडाचा वापर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, भविष्यात या पुलाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण कामाची तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सोलापूरतुळजापूर महामार्गावरील सिंदफ ळगाव परिसरात नळदुर्ग बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा मोठा पूल उभारण्यात येत आहे. सध्या या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र भरावासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या भरावामध्ये मोठमोठ्या दगडी शिळा आणि मांजरा दगडाचा वापर करण्यात आला आहे. मांजरा दगड कालांतराने झिजून त्याची माती होत असल्याने अशा दगडाचा वापर पुलासाठी योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे भविष्यात पुलाच्या स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे, भरावामधील मोठे दगड दिसू नयेत म्हणून त्यावर बाजूच्या रस्त्यावरील मुरूम टाकून झाकण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अनियमित मोठ्या शिळा किंवा विहिरीतील दगड विनातांत्रिक मंजुरी टाकणे योग्य मानले जात नाही. मोठ्या दगडांमधील पोकळ्या योग्य साहित्याने भरल्या नाहीत तर भविष्यात भराव खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. निकृष्ट किंवा सहज झिजणारा दगड वापरणेही तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरू शकते. भरावासाठी वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता. कॉम्पॅक्शन (घट्टीकरण) चाचण्या. घनता आणि CBR चाचणी. डिझाइननुसार योग्य साहित्य वापरले का? अभियंत्यांच्या मंजुरीनुसार काम झाले का? त्यामुळे प्रत्यक्षात भरावात कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले गेले आहे, याची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी काहीनी ठेकेदाराशी चर्चा केल्याची माहिती समोर येत असली, तरी त्यानंतर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. काहींनी यामागे आर्थिक व्यवहार झाल्याच्याही चर्चा या भागातील ग्रामस्थ मधून चर्चिली जात आहे त्यामुळे लोकांचे जीवन डोक्यात घालून लाभ उठवणारीआर्थिक टोळी कोण याचीही नावे आता चविष्ट तिने चर्चेली जात आहेत.
