तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर यांनी रविवारी (दि. 12) सहकुटुंब व सहपरिवार श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपसभापतीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेर यांच्या आगमनानिमित्त तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

तीर्थक्षेत्र तुळजापुरात दाखल होताच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सचिन आहेर यांचे पुष्पगुच्छ देऊन व जयघोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतानंतर आहेर यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन विधिवत दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी आहेर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधत जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करण्याची भूमिका व्यक्त केली. उपसभापती म्हणून घटनात्मक जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्वागत सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि आहेर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 
Top