तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शासकीय जागेवरील रस्त्याच्या अतिक्रमणाच्या वादाने नवे वळण घेतले असून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषद घेऊन संघटनेने आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणात माजी सैनिक श्रीकांत सौदागर गाटे न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा करण्यात आली.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामग्रहात पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, दत्तात्रय सोनवणे, बालाजी जाधव, सरिका चुंगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संघटनेच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या संघटनेतील एका पदाधिकाऱ्याने तब्बल 24 वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील चर्चेदरम्यान त्यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.
सहा महिन्यांपूर्वी काटी येथील शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी लेखी अर्ज करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला. संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणातील गुन्हे मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा न्यायालयीन लढ्यासह राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
