भूम (प्रतिनिधी)- 'भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी'.... या अभंगाप्रमाणे संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचे शहरात हजारो वारकऱ्यासह शुक्रवारी दि. 17 जुलै रोजी आगमन होताच जोरदार आतषबाजी करत पालखी आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी करत पालखीचे दर्शन घेतले .दरम्यान,श्री संत बाळूमामा च्या मेंढरांनी येथील नगरपालिका चौकात संत मुक्ताबाई यांच्या पालखीला गोल रिंगण केले. हा सोहळा भूमकरांनी मोठ्या उत्साहात पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी पोलिसांनी रिंगण सोहळा घेण्यास विरोध केला होता.
संत मुक्ताबाई च्या पालखी आज 22 वा मुक्काम असून पालखीला 600 किलोमीटर अंतर कापत 30 दिवस पंढरपूर पर्यंत पोहोचण्यासाठी लागतात .या पालखीसोबत लहान-मोठे अशा 130 दिंड्या असतात. या पालखी सोहळ्याला 319 वर्षाची परंपरा आहे. हा पालखी सोहळा सहा जिल्ह्यामधून मार्गस्थ होऊन पंढरपूरला पोहोचतो. शुक्रवारी सकाळी येथील वाशी रोड मार्गे चौंडेश्वरी मंदिर येथे पालखी सोहळा विसावला. येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळचा नाश्ता नागोबा तरुण मंडळाच्या वतीने तर कोष्टी समाज बांधवांच्या वतीने वारकऱ्यांना भोजन देण्यात आले. तसेच हा पालखी सोहळा रवींद्र हायस्कूल येथे मुक्कामी राहून शनिवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
शहरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर नगरपरिषद समोर नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी पूजन केले. तसेच जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने गटनेते रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, नवनाथ रोकडे, चंद्रमणी गायकवाड, विठ्ठल बागडे, अमोल गाडे, अलमपभु यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप शाहू महाराज, विश्वस्त हरिभाऊ पवार, रमेश मसकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांनीही दिंडीचे स्वागत केले.
“दिंडी निघाल्यापासून राज्यभर पोलिस प्रशासनाने आम्हाला सुरक्षा व सहकार्य दिले. मात्र भूम येथे रिंगण सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली. चोरी होण्याचे कारण देत नियोजित ठिकाणी रिंगण घेऊ नका, असे सांगण्यात आले. हा प्रकार दुर्दैवी असून याबाबत मी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे पोलिस प्रशासनाची तक्रार करणार आहे.
- रवींद्र पाटील, दिंडी अध्यक्ष
“आमचा रिंगण सोहळ्याला विरोध नव्हता. तो केवळ अधिक मोकळ्या व प्रशस्त जागेत घ्यावा, जेणेकरून चोरीचे प्रकार घडणार नाहीत. एवढीच आमची भूमिका होती.
गणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक भूम

