धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या दुसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील 46 हजार 46 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करून ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे.
राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 1 एप्रिल 2019 नंतर वितरित झालेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वन टाईम सेटलमेंट' (ओटीएस) योजना लागू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पूर्वी थकबाकीची रक्कम भरल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर बँकांनी थकीत पीक कर्जदारांची माहिती भरली होती.त्याआधारे 22 जुलै 2026 रोजी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर 24 जुलै रोजी राज्यातील सुमारे 17 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या यादीत धाराशिव तालुक्यात 8 हजार 38, उमरगा 5 हजार 25, कळंब 7 हजार 670, तुळजापूर 5 हजार 878, परांडा 5 हजार 841,भूम 6 हजार 248, लोहारा 2 हजार 113 आणि वाशी 5 हजार 233 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या याद्या ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,चावडी,संबंधित बँक शाखा तसेच विविध मोबाईल गटांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
