तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील विविध चौक, बसस्थानक परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कथित मटका-जुगार व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडत असल्याचा आरोप करत रविंद्र साळुंके यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित मटका बुकी व एजंटांवर कठोर कारवाई करून उधारीवर मटका देण्याची प्रथा तातडीने बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरातील विविध चौकांमध्ये व आडबाजूच्या ठिकाणी मटका व्यवसाय सुरू असून काही एजंट नागरिकांना उधारीवर मटका खेळण्यास प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे अनेक जण लाखो रुपयांच्या कर्जात अडकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय उधारीच्या रकमांवर चक्रवाढ व्याज आकारले जात असून वसुलीसाठी संबंधितांकडून नागरिकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमोर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून काही महिलांवर दागिने विकण्याची वेळ आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरातील बेकायदेशीर मटका-जुगार व्यवसायावर प्रभावी कारवाई करावी, उधारीवर मटका देणाऱ्या एजंटांना सक्त मनाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.