कळंब (प्रतिनिधी)-  नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या कथित खेळाविरोधात कळंब शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सकल मराठा समाज, सकल कळंबकर आणि सकल मुस्लिम युवक संघटना महाराष्ट्र  कळंब शहर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचीही चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करा, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे‌‘ अशा जोरदार घोषणा देत शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात संताप व्यक्त केला. नीट पेपर लीक प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण आणि परीक्षाप्रक्रियेत पारदर्शकता. जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी. अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, ज्योतीताई सपाटे, ॲड. अशोक चोंदे, अप्पासाहेब शेळके, तुषार वाघमारे, जावेद सौदागर, इम्रान मिर्झा, बजरंग ताटे, मुकुंदराजे शेळके, सुजित लिमकर, ॲड. शिवराज मराठे, महादेव पांचाळ, भूषण देशमुख, ॲड. पृथ्वीराज देशमुख, मुस्लिम सेवा संघाचे इस्माईल हनुरे, आमन शेख, ॲड. मनोज थोरात, ॲड. कुणाल डिकले, इंदूताई तनपुरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


 
Top