धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा आणि खानदेश असा असणारा देवगिरी प्रांत खऱ्या अर्थाने इतिहासाचा मोठा ठेवा आहे, देवगिरी प्रांताचे संचित संस्कार भारतीच्या माध्यमातून संकलित व्हावे त्यासाठी  प्रांताने पुढाकार घ्यावा असे आवाहन इतिहास संशोधक लक्ष्मीकांत धोंड यांनी केले. 

संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उद्घाटक म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक लक्ष्मीकांत धोंड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रांताचे अध्यक्ष  प्रा.स्नेहलताई पाठक या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नटराजाचे पूजन उद्घाटक लक्ष्मीकांत धोंड व पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजीनगर येथेबालाजी मंगल कार्यालयात संपन्न झाले. उद्घाटनानंतर संस्कार भारतीचे ध्येय गीत सौ अनुजा पाठक यांनी गायले. खानदेश व मराठवाड्यातून या सभेला 85 प्रतिनिधी उपस्थित होते. उद्घाटनाच्या नंतर छत्रपती संभाजी नगर समितीच्या वतीने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध तबलावादक शरद दांडगे हे होते. प्रांताचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक वर भाषणामध्ये वर्षभरातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची माहिती देऊन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उद्घाटक लक्ष्मीकांत धोंड यांनी मराठवाडा ही संतांची भूमी आहे येथे असणारा प्राचीन स्थापत्य इतिहास नव्या पिढीसमोर येण्यासाठी संस्कार भारतीने देवगिरी प्रांताचे संचित दोन ग्रंथाच्या माध्यमातून संकलित करावे त्याचा उपयोग भविष्यात नव्या पिढीला होईल आणि इतिहास देखील या निमित्ताने जगासमोर लिखित स्वरूपात मांडला जाईल असे सांगितले. कला क्षेत्रामध्ये संस्कार भारती ने आजपर्यंत केलेले कार्य लक्षात घेता या कामासाठी संस्कार भारतीने पुढाकार घेतला तर देवगिरी प्रांताचा इतिहास चांगल्या पद्धतीने शब्दबद्ध होऊ शकेल असा आशावाद इतिहास संशोधक लक्ष्मीकांत धोंड यांनी मांडला. 

याप्रसंगी प्रमुखातिथी संस्कार भारती पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी संस्कार भारतीने काळाच्या बदलाप्रमाणे काही बदल निश्चित केले आहेत, कलाक्षेत्रामध्ये वैचारिक भूमिका घेऊन काम करण्याचा निर्धार संस्कार भारतीने केला असून ही वैचारिक कटिबद्धता सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हा स्थानापर्यंत आणि समिती स्तरावर उपयोगात आणावी अशी सूचना केली. आपले कार्यक्षेत्र संस्कार भारतीने अधिक व्यापक करत असताना युवक आणि महिला यांना समोर ठेवून संघटनेची कार्यपद्धती पुढे आणली आहे असे सांगितले. याप्रसंगी प्रमुखातिथी प्रांत संघचालक अनिल भालेराव यांनी संभाजीनगर येथील 1987 वर्षामध्ये संस्कार भारतीचे संस्थापक हरिभाऊ वाकणकर, राष्ट्रसंघाचे मोरोपंत पिंगळे, प्रल्हाद अभ्यंकर यांच्यासोबतच्या संस्कार भारतीच्या आठवणी सांगून लक्ष्मीकांत धोंड यांनी देवगिरी प्रांताचा इतिहास संकलनाची मांडलेली कल्पना नव्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. प्रांताचे अध्यक्ष प्रा . स्नेहलताई पाठक यांनी बोलताना संस्कार भारती केंद्राने जे बदल सुचवलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी सर्व प्रांत पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित करावे, उत्तम कला सादरीकरण करणारे कार्यक्रम आणि उत्तम कलावंताची संघटन करण्यासाठी आगामी काळात काम करावे असे सांगितले. 

प्रसिद्ध तबलावादक शरद दांडगे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील सौ. अनुजा पाठक, नीलिमा देशपांडे सारिका कुलकर्णी बागेश्री देशपांडे यांनी सुमन कल्याणकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यांचे बहारदार सादरीकरण केले, याप्रसंगी शिल्पकार कैलास आडे यांनी आशा भोसले यांची शिल्पाकृती साकार केली. दोन दिवस संस्कार भारतीच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी प्रांत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मागील वर्षाच्या सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी यांनी मांडलेल्या इतिवृत्ताला, आणि कोष प्रमुख मोहन रावतोळे यांच्या वार्षिक खर्चाला मान्यता देण्यात आली. अखिल भारतीय सहकोषप्रमुख श्रीपाद जोशी यांनी दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या दोन सत्रांमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. मार्तंड कुलकर्णी व आभार श्रीपाद पदे यांनी मानले. प्रांताचे कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, उपाध्यक्ष विश्वनाथ दाशरथे, डॉ. अरविंद देशमुख, जयंत शेवतेकर, ॲड. संजय घायाळ, संभाजीनगर समितीचे अध्यक्ष सौ. माधुरी धोंड, अमित देशपांडे, सौ वृषाली चाटोरीकर, प्रा. जयेंद्र कुलकर्णी,  संतोष बिडकर,  अमित देशपांडे, पं. विश्वनाथ दशरथे, सौ वैशाली गोस्वामी, मुकुंद मिरगे, सौ. अनुजा पाठक यांनी ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले व धाराशिव जिल्हा संस्कार भारती पदाधिकारी व प्रांत सहमहामंत्री डॉ.सतिश महामुनी , प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ , फोटोग्राफी संयोजक पद्माकर मोकाशे , जिल्हा उपाध्यक्ष प्रफुलकुमार शेटे, सह कोषप्रमुख अविनाश धट , भुअंलकरण प्रमुख    लक्ष्मीकांत सुलाखे, जिल्हा मंचीय संयोजक प्रविण गोरे , तुळजापूर समिती संयोजिका सौ. अपर्णा शेटे , जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. गीता व्यास , सौ.माधुरी कनगरकर सर्वसाधारण सभेसाठी  उपस्थित होते .


 
Top