भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मानाचा समजला जाणारा संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भूम शहरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असून, शुक्रवारी (ता. 17) पालखीचे भूम शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, व्यापारी, मंडळे तसेच प्रशासनाच्या वतीने स्वागत व वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या निवास, भोजन, आरोग्य व अन्य मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण आणि तहसीलदार जयवंत पाटील यांनी श्री चौंडेश्वरी मंदिर तसेच रवींद्र हायस्कूल परिसराला भेट दिली. यावेळी वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये, सुरक्षा, आरोग्य सेवा आदी बाबींचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान व भूम ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागोबा चौक येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वारकऱ्यांची नेत्र तपासणी करून आवश्यक त्या व्यक्तींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दंत तपासणीसह पावसाळ्याचा विचार करून रेनकोटचेही वितरण केले जाणार आहे.
पालखी दुपारच्या सुमारास श्री चौंडेश्वरी मंदिरात विसाव्यासाठी दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था समस्त कोष्टी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकऱ्यांसाठी प्रेमपूर्वक भोजनाची सेवा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
पालखीचा रात्रीचा मुक्काम श्री चौंडेश्वरी मंदिरात होणार असून, रात्री हरिनाम संकीर्तन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनातून संत परंपरा, समाजप्रबोधन, नैतिक मूल्ये आणि वारकरी संप्रदायाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कीर्तनानंतर दिंडी जी. डी. सुळ व रवींद्र हायस्कूल परिसरात मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे नागोबा तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून, त्यानंतर संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार आहे.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भूम शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवक, व्यापारी, विविध मंडळे आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे. प्रशासनानेही सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, वारकऱ्यांचा मुक्काम सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.