धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील महिलांसह सर्व नागरिकांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीची नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून, शहरातील विविध भागांत नवीन स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी, नगर परिषद धाराशिव यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
विश्व हिंदू परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रुपामाता फाऊंडेशनचे सचिव ॲड. अजित गुंड पाटील यांनी दि. 6 मे 2026 रोजी शहरातील प्रमुख बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर व सार्वजनिक ठिकाणी विशेषतः महिलांना भेडसावणाऱ्या स्वच्छतागृहाच्या समस्येबाबत निवेदन सादर केले होते.
नगर परिषदेने दि. 25 जून 2026 रोजी दिलेल्या उत्तरात शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच मुख्य बाजारपेठेत नवीन सुलभ स्वच्छतागृहाचे काम सुरू असून, जिजाऊ चौकछत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बार्शी नाकाडीआयसी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकछत्रपती शाहू महाराज चौक तसेच महिला रुग्णालयआकाशवाणी परिसर येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी जागेची पाहणी पूर्ण करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया राबवून पुढील सहा महिन्यांत ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ॲड. अजित गुंड पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरातील महिलांसह सर्व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
