भूम (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदायातील मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एक असलेल्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे भूम शहराशी अनेक दशकांपासून अतूट नाते आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या संत भावंडांपैकी संत मुक्ताबाईंची ही पालखी दरवर्षी भूम मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते. या पालखीचा भूम येथील मुक्काम आणि त्यानिमित्ताने होणारी वारकऱ्यांची सेवा ही शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे. या पालखीतील वारकऱ्यांना गेल्या 70 वर्षापासून कोष्टी समाज बांधव कोणतीही प्रसिद्धी न करता निस्वार्थ भावनेने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करत आहेत.
पालखीचा मुक्काम शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिरात असतो. येथे रात्री हरिनामाचा गजर, कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम रंगतो. या काळात शहरातील भाविक, सामाजिक संस्था, विविध मंडळे, व्यापारी तसेच अनेक स्वयंसेवक पालखी व्यवस्थेसाठी पुढाकार घेतात. वारकऱ्यांच्या निवासापासून पिण्याचे पाणी, भोजन आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने योगदान देतात. कोष्टी समाजाच्या भोजन व्यवस्थेची परंपरा मात्र आजही तितक्याच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने जपली जात आहे. समाजातील प्रत्येक कुटुंब आपल्या घरातून भाजी, भाकरी, चपात्या, धपाटे आणि इतर पदार्थ तयार करून आणते. हे सर्व अन्न एकत्र करून हजारो वारकऱ्यांना प्रेमाने भोजनप्रसाद म्हणून वाढले जाते.
या भोजनाची खासियत म्हणजे प्रत्येक घरातून आलेल्या भाज्या एकत्र केल्या जातात. त्यामुळे तयार होणाऱ्या या मिश्र भाजीला एक आगळीवेगळी चव प्राप्त होते. वारकरीही या घरगुती, प्रेमाने बनविलेल्या भोजनाचा मनापासून आस्वाद घेतात. अनेक वारकरी या भोजनप्रसादाची आठवण वर्षानुवर्षे जपून ठेवतात.
या सेवाकार्यात समस्त कोष्टी समाजातील महिला, पुरुष, युवक, श्री चौंडेश्वरी तरुण मित्र मंडळ तसेच समाजातील ज्येष्ठ मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. पहाटेपासूनच भोजन संकलन, वर्गीकरण, वाटप आणि स्वच्छतेपर्यंत प्रत्येक काम स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतात.
वारकरी संप्रदायात 'अन्नदान हेच श्रेष्ठ दान' मानले जाते. हीच भावना जपत भूमच्या कोष्टी समाजाने गेल्या सात दशकांपासून अखंड सेवा सुरू ठेवली आहे. बदलत्या काळात अनेक परंपरा लोप पावत असताना, भूम शहरातील ही सेवाभावी परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू असून वारकरी संप्रदायासाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.
