धाराशिव (प्रतिनिधी)-  हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्ग 65 वर रात्रीच्या वेळी कार थांबवून आराम करणाऱ्या प्रवाशांना चाकू आणि लोखंडी टॉमीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार अज्ञात दरोडेखोरांनी कारची काच उघडायला लावून प्रवाशांना बेदम मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून दक्षिण सोलापूरच्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत संजीव रेड्डी (वय 30 वर्षे, रा. एलआयजी 21, हाउसिंग बोर्ड कॉलनी, हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक) हे 11 जुलै 2026 रोजी आपल्या मित्रासह कारने हुमनाबादहून पुण्याच्या दिशेने जात होते. मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास चालकाला थकवा आल्याने त्यांनी आपली कार तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी पाटीजवळ महामार्गाच्या कडेला लावली आणि गाडीतच आराम करत थांबले. दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार अज्ञात भामटे तिथे आले आणि त्यांनी कारला वेढा घातला. चोरट्यांनी कारच्या काचेवर लोखंडी टॉमी मारत अभिजीत यांना काच खाली करण्यास भाग पाडले. काच उघडताच आरोपींनी धारदार चाकू आणि लोखंडी टॉमीचा धाक दाखवला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना टॉमीने बेदम मारहाण करून जखमी केले.

त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्याकडील 15,000 रुपये रोख, 1 तोळ्याची सोन्याची चैन, 2 तोळ्यांचा चांदीचा कडा आणि मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 65 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जबरीने ओरबाडून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या भयंकर लूटमारीनंतर जखमी अभिजीत रेड्डी यांनी 12 जुलै 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी अज्ञात 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 309(6) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला.  गुन्हा दाखल होताच नळदुर्ग पोलिसांच्या शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयावरून सोलापूर जिल्ह्यातील जाविद इमाम सय्यद (वय 33 वर्षे, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) या आरोपीला ताब्यात घेतले. 3 साथीदारांच्या मदतीने महामार्गावर हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. 

 
Top